श्रीक्षेत्र माळेगाव, मिडीया सेंटर, 13- माळेगाव येथे दरवर्षी भरणा-या श्री खंडोबा यात्रेनिमित्त विविध राज्यातून लाखो भाविक श्री खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. या भाविकांना माळेगाव यात्रा येथे मंदीर ट्रस्टच्या वतीने आठ दिवस अन्नदान केले जाते, अशी माहिती मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद वसंतराव पाटील, सचिव आर. एम. कनकदंडे यांनी दिली आहे.
दररोज सकाळी पाच ते सहा या वेळात अभिषेक केला जातो. यावेळी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत खिचडीचे भाविकांना वाटप केले जाते. साडेनऊये ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भंडारा महाप्रसादाचे आयोजन केले जाते. वरण, भात, भाजी, पोळी व एक गोड पदार्थ दिला जातो आणि सायंकाळी सहानंतर खिचडी, मुरमुरे किंवा इतर प्रसादाचे भाविकांना वाटप केले जाते. गेल्या अनेक वर्षापासून मंदीर ट्रस्टच्या वतीने अन्नदान करण्यात येते. यावेळी मंदिर परिसरात स्वच्छता ठेवण्यावर भर दिला आहे. याठिकाणी हात धुण्यासाठी 25 नळाची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर ट्रस्टच्या वतीने यात्रा कालावधीत शंभर क्विंटल अन्न शिजवले जाते. मंदीरातील पुजारी भाविकांना देवदर्शन घडवून आणतात. येथे दररोज पन्नास हजाराहून अधिक भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात.
No comments:
Post a Comment