नांदेड/प्रतिनिधी-हैद्राबाद संस्थानातील जनतेने केलेल्या व्यापक संघर्षामुळे जगातील श्रीमंत असलेल्या हैद्राबाद प्रांताचा संस्थानिक असलेल्या निझामाला पळ काढावा लागला. या तीव्र जनसंघर्षामुळे हैद्राबाद सारखे शक्तीशाली संस्थान भारतात विलिन होवू शकले, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव तथा साम्यवादी नेते डॉ.कॉ.भालचंद्र कानगो यांनी व्यक्त केले.
कॉ.अनंतराव नागापूरकर प्रतिष्ठान व लोकवाङ्मय गृह च्यावतीने राज गोडबोले लिखित ‘‘ध्येयाच्या वाटेवरील ‘अनंत’ प्रवास व सुराज्याचे लढवय्ये’’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन प्रसिद्ध लेखक व विचारवंत प्रा.जयदेव डोळे व डॉ.कॉ.भालचंद्र कानगो यांच्या हस्ते रविवारी थाटात- माटात झालेल्या समारंभात प्रकाशित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा जनता विकास परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष तथा माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे हे तर अ.भा. नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दत्ता भगत, कॉ.इसा खान प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कॉ.अनंतराव नागापूरकर यांच्या पत्नी प्रेमीलाबाई नागापूरकर ह्या उपस्थित होत्या. प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ कॉ.व्यंकटराव करखेलीकर यांना कॉ.अनंतराव नागापूरकर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर किनवटचे माजी उपनगराध्यक्ष कॉ.गंगारेड्डी बैनमवार यांचा कार्यगौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. यावेळी माहूरचे दिवंगत कॉ.उत्तमराव राठोड यांचाही मरणोत्तर कार्यगौरव पुरस्कार देवून त्यांच्या कुटुंबियांना सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट संघटक म्हणून महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष बालाजीराव पवार यांचा व कॉ.के.एन.हटकर यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. दै.श्रमिक एकजूट कॉ.अनंतराव नागापूरकर पत्रकारिता पुरस्काराने माहूरचे पत्रकार वसंतराव कपाटे यांचाही गौरव करण्यात आला. याप्रसंगी पत्रकार प्रल्हाद उमाटे व अमोल अंबेकर यांचा पत्रकारांसाठी असलेल्या शासकीय अधिस्विकृती विभागीय समितीत निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी सायं दैनिक नांदेड वार्ताच्या 22 व्या वर्धापन दिन विशेषाकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलतांना डॉ.कानगो म्हणाले की, स्वातंत्र भारताच्या दृष्टीने हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होणे अत्यंत आवश्यक होते. या लढ्याला हिंदू-मुस्लिम वादाचे स्वरुप देण्याचा काहीजण प्रयत्न करीत आहेत. परंतु कॉ.हबीबोद्दीन, कॉ.मकदुम मोईयोद्दीन, नांदेडचे कॉ.अब्दुल मज्जीद, कॉ.सय्यद मुसा या सारख्या धर्माने मुस्लिम असलेल्या अनेक स्वातंत्र्य सैनिक या लढ्यात अग्रभागी होते. कॉ.व्ही.डी. देशपांडे, कॉ.सी.डी.चौधरी, कॉ.करुणाभाभी, कॉ.अनंतराव नागापूरकर हे स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या खांद्याला खांदा देवून या लढ्याचे नेतृत्व करीत होते. त्या काळात निझाम हा जगातील सर्वात श्रीमंत संस्थानिक होता. आर्थिक व सशस्त्र दृष्ट्या बलवान असलेल्या जुलमी निझामाविरोधात कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, भूमीहिनांनी एल्गार पुकारला होता. यावेळी तेलंगण भागात जमिनदारांविरोधात कम्युनिस्टांनी ग्राम स्वराज्यासाठी उभारलेल्या चळवळीमुळेच भारत सरकारला हैद्राबाद संस्थानात लष्करी कारवाई करावी लागली, असा दावा त्यांनी केला.
जागतिक श्रीमंती विरुद्ध सर्वसामान्यांचा लढा-जयदेव डोळे
यावेळी बोलतांना जयदेव डोळे म्हणाले की, हैद्राबाद मुक्ती संग्रामात सर्वसामान्यांचा सहभाग हा महत्वपूर्ण होता. जगातील श्रीमंत असलेल्या जुलमी निझामाविरुद्ध दारिद्रयात असलेल्या सर्वसामान्यांनी दिलेला हा लढा म्हणजे जागतिक श्रीमंताविरुद्ध सर्वसामान्यांनी न्याय हक्क व लोकशाही अधिकारासाठी पुकारलेला लढा होता, असे मत प्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक जयदेव डोळे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्य सैनिक हुताम्यांनी इंग्रज व जुलमी निझामासारख्या राजेशाही विरुद्ध लढा दिला. हा लढा केवळ राजा-राजवाड्यांविरुद्ध नव्हता तर सर्वसामान्यांवर होणार्या अन्याय, अत्याचार आणि जाती-धर्मात असलेली असमान वागणूक व समाजातील विषमतेविरुद्ध होता. आज पुन्हा देश विषमता आणि एकाधिकारशाहीकडे वळत असतांना कॉ.अनंतराव नागापूरकरांचे जीवन चरित्र नवीन पिढीला प्रेरणा देणारे ठरणार आहे. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना डॉ.काब्दे यांनी हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यातील नागापूरकर परिवाराच्या सहभागाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. अशा प्रकारच्या कार्यक्रमातून सत्य इतिहासाची मांडणी लोकांसमोर होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर यांनी केले. तर पुस्तकाचे लेखक राज गोडबोले व त्यांची कन्या ऋतीका गोडबोले यांनी मनोगत व्यक्त केले. गौरवमूर्तींच्यावतीने ऍड.कॉ.व्यंकटराव करखेलीकर यांनी खुमासदार मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचलन पत्रकार राम तरटे यांनी तर आभार प्रदर्शन कॉ.उज्ज्वला पडलवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फारुख अहमद, अविनाश पाटील, कॉ.विजय गाभणे, प्रा.राजाराम वट्टमवार, कॉ. शिवाजी फुलवळे, कॉ.गणेश संदुपटला, सुर्यकांत वाणी आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment