आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व श्रीरामप्रताप मालपाणी मूकबधिर विद्यालयात आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे सदस्य बद्रीनारायण मंत्री यांच्या हस्ते हेलन केलर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सकाळी ९ वाजता काढण्यात आलेल्या प्रभात फेरीस बद्रीनारायण मंत्री यांनी हिरवी झेंडी दाखवली. या प्रभात फेरीत दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. समाजात दिव्यांग सक्षमीकरणाचा संदेश देणारी घोषवाक्ये आणि जनजागृतीपर फलक तसेच पोर्टेबल साउंड सिस्टीम हे प्रभात फेरीचे विशेष आकर्षण होते.
प्रभात फेरीनंतर विद्यालय परिसरात कला व क्रीडा क्षेत्रातील विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश, स्वप्नं व कल्पनाशक्तीचे सुंदर चित्ररूप सादरीकरण केले. क्रीडा स्पर्धांमध्ये धावणे, गोळाफेक, लांब उडी यांसारख्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रांगोळी स्पर्धेत मूकबधिर विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार पाहायला मिळाला. रांगोळी स्पर्धेत लहान गटातील श्रद्धा सोनटक्के व मोठ्या गटातील अंजली पावडे हिचा प्रथम क्रमांक मिळवला. मतिमंद प्रवर्गात मैदानी खेळात अतिफ पठान, हुझैफा बेग, मोहन इरपे, श्रुतिका व इतर यांचा सहभाग होता.
या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. दिवसभर चाललेल्या कार्यक्रमांना विद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून आणि शिक्षकांकडून उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.
आजपासून दिव्यांग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शाळा प्रशासनाने भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. सदर जागतिक दिव्यांग दिनाचा व दिव्यांग सप्ताहाचा उत्सव यशस्वी व्हावा यासाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार व सल्लागार दिनकर नाठे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालय व श्री रामप्रताप मालपाणी मूक बधिर विद्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment