नांदेड/प्रतिनिधी-आशियाखंडात प्रसिध्द असलेल्या लोहा तालुक्यातील
माळेगांव येथील खंडोबा यात्रेतील विविध स्पर्धकांना कंधार-लोहा विधानसभा
मतदारसंघाचे आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या शांतीदूत
प्रतिष्ठाणच्यावतीने सात लाख रुपयांचे बक्षिस यंदापासून सुरु करण्यात येत
असल्याची माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष जि.प.चे माजी सभापती प्रविण पाटील
चिखलीकर यांनी दिली आहे.
दक्षिण भारतातील प्रसिध्द असलेल्या माळेगांव यात्रेच्या वैभवात भर
टाकण्याचा निर्णय कंधार येथील शांतीदूत प्रतिष्ठाणने घेतला आहे.
माळेगांवची यात्रा जिल्हा परिषद प्रशासन व लोहा पंचायत समिती, माळेगांव
ग्रामपंचायतच्यावतीने दरवर्षी आयोजित केली जाते. या यात्रेनिमित्त
जि.प.प्रशानाच्यावतीने विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते. यात्रा निधीच्या
कमरतेमुळे जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणार्या बक्षिसांची रक्कम
अतिशय तुटपुंजी आहे.
यात्रेतील विविध स्पर्धेत सहभागी होणार्या स्पर्धकांना प्रोत्सहान
देण्याचा निर्णय घेवून शांतीदूत प्रतिष्ठाणने मोलाचे एक पाऊल पुढे टाकून
यात्रेच्या वैभवात भर टाकण्यासाठी सरसावले आहे. जिल्हा परिषदेच्यावतीने
आयोजित करण्यात येणार्या पशुसंवर्धन स्पर्धेतील चॅम्पियन लाल कंधार नर व
मादी गटातील विजेत्यांना शांतीदूत प्रतिष्ठाणच्यावतीने प्रत्येकी 31
हजाराचे बक्षिस जाहिर करण्यात आले आहे. लालकंधारी मादी व नर या दोन्ही
गटांना प्रत्येकी पहिले बक्षिस 21 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
चॅम्पियन देवणी नर व मादी या दोन्ही गटासाठी प्रत्येकी 21 हजार रुपयांचे
बक्षिस ठेवण्यात आले आहे.
शंकरपट स्पर्धेतील विजेत्यांना पहिलं बक्षिस 51 हजार, दुसरं बक्षिस 41
हजार, तिसरं बक्षिस 31 हजार, चौथं बक्षिस 21 हजार, पाचवं बक्षिस 11 हजार
देण्यात येणार असून स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकांना
प्रोत्सहानपर बक्षिस म्हणून प्रत्येकी 1001 रुपयेही देण्यात येणार
असल्याचे प्रविण पाटील चिखलीकर यांनी सांगितले आहे.
माळेगांव यात्रेत दरवर्षी महाराष्ट्रातील नामवंत लोकनाट्या मंडळ सहभागी
होत असतात त्यांना जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणार्या बक्षिसांची
रक्कम खूप अल्प असते. त्यासाठी शांतीदूत प्रतिष्ठाणने यंदा यात्रेत
सहभागी होणार्या प्रत्येक लोकनाट्य मंडळास 11 हजार रुपयांचे बक्षिस
देण्याचा निर्णय प्रतिष्ठाणने घेतला आहे. यात्रेतील लावणी महोत्सवात
सहभागी होणार्या प्रत्येक लावणी कलाकार संचास प्रतिष्ठणच्यावतीने
प्रत्येकी 11 हजाराचे रोख बक्षिस देण्यात येणार असल्याची घोषणा
प्रतिष्ठाणचे अध्यक्ष माजी जि.प.सभापती प्रविण पाटील चिखलीकर यांनी केली
आहे.
जिल्हा राष्ट्रवादीचे नेते तथा कंधार-लोहा विधानसभा मतदार संघाचे
लोकप्रिय आ.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मतदारसंघात माळेगांवची
यात्रा भरते. यात्रेतील स्पर्धेत सहभागी होणार्या स्पर्धकांचे
प्रोत्साहन वाढवून यात्रेच्या वैभवात भर टाकण्यासाठी शांतीदूत
प्रतिष्ठाणने हे रोख बक्षिस देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद व
पंचायत समितीच्यावतीने दरवर्षी देण्यात येणार्या बक्षिसाच्या व्यतीरिक्त
स्पर्धेतील विजेत्यांना प्रतिष्ठाणच्यावतीने हे बक्षिस देण्यास येणार
असल्याची माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रविण पाटील चिखलीकर यांनी दिली
आहे.
No comments:
Post a Comment