मुंबई - गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना सराईत गुन्हेगाराच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या देऊन फोटो काढतात त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या हातात नावाच्या पाट्या देऊन फोटो काढले जात आहेत. गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे
चव्हाण म्हणाले, की उस्मानाबाद जिल्ह्यातील एकोंडी गावातील शेतीचे गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. पंचनामे झाल्यावर सरकारी मदत मिळेल, या आशेवर शेतकरी पंचनाम्याची वाट पाहत होते. पंचनामा करायला आलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना गारपिटीमुळे उद्ध्वस्त झालेल्या पिकात उभे करून त्याच्या हातात नाव लिहिलेली पाटी देऊन गुन्हेगाराप्रमाणे त्यांचे फोटो काढले. पंचनामे करताना या अधिकाऱ्यांनी महिला शेतकऱ्यांच्या हातात ही आरोपीसारख्या पाट्या देऊन त्यांचे फोटो काढले. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील असून, सरकारने शेतकऱ्यांची क्रूर थट्टा चालवली आहे, असे चव्हाण म्हणाले.

No comments:
Post a Comment