विशेष प्रतिनिधी
मुंबई- ‘कोरेगाव भीमा हिंसाचाराचा सूत्रधार मिलिंद एकबोटे यास २००१ मध्ये पुणे जिल्ह्यातील सासवड येथील हिंदू- मुस्लिम दंगलीसंदर्भात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) लावण्याची पुणे पोलिसांनी शिफारस केली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांना तशी कारवाई न करण्याची सूचना केली हाेती,’ असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी रविवारी केला.
पुणे पाेलिसांची त्यावेळची नोटही त्यांनी पत्रकारांना सादर करत ‘तेव्हाच एकबाेटेवर कारवाई झाली असती तर काेरेगावात हिंसाचार घडलाच नसता,’ असा दावाही केला. शरद पवार यांचे आजपर्यंतचे वर्तन ‘मुँह मे राम, बगल मे छुरी’ असे राहिले असल्याचे अांबेडकर म्हणाले. एकबोटे भाजपशी संबंधित होते, तरी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीशी घातले. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असेल अशा कोणत्याही राजकीय आघाडीत भारिप बहुजन महासंघ सामील होणार नाही. त्यामुळेच आपण २६ जानेवारी रोजी निघालेल्या संविधान बचाओ रॅलीत सहभागी नव्हतो, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment