एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांना मंत्री करण्यास शिवसेनेचा असलेला विरोध दूर करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अखेरीस यश आले आहे. 27 डिसेंबर रोजी राणे यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. मात्र भाजपमध्ये घेतल्यास शिवसेनेची नाराजी ओढवून घेण्यास कोणीही तयार नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांनी राणे यांना स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. ही चाल लक्षात आल्याने शिवसेनेने राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाला आणखी तीव्र विरोध केला.
खुद्द मुख्यमंत्रीही त्यामुळे राणेंच्या मंत्रिमंडळ समावेशाबद्दल ठामपणे काही सांगत नव्हते. शिवसेनेच्या नेत्यांची समजूत काढण्यात आल्यानंतरच अखेर मुख्यमंत्र्यांनी राणे यांना मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राणे यांना मंगळवारी रात्री बोलावून घेतले. दोघांमध्ये मंत्रिमंडळ समावेशाबाबत चर्चा झाल्याचे समजते. 27 डिसेंबर रोजी त्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

No comments:
Post a Comment