नांदेड दि. 6 -
नांदेड शहरामध्ये शिवसेना पक्षाची राजकीय ताकद अधिक असून शिवसेनेकडे नांदेड महानगरपालिकेच्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची संख्या एका जागेसाठी चारहून अधिक आहे. त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी युती होईल, अथवा न होईल ही बाब लक्षात घेऊन स्वबळाची तयारी ठेवावी, असे मत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी व्यक्त केले.
शिवसेनेचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची आढावा बैठक शहरातील वामनराव पावडे मंगल कार्यालयात दि. 6 डिसेंबर रोजी आ. बालाजीराव कल्याणकर व जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आ. बालाजीराव कल्याणकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाधरराव बडुरे, उमेश मुंढे, मंगेश कदम, बळवंत तेलंग, अपर्णा नेरलकर, दर्शनसिंघ संधू, राजू गुंडावार, संतोष माजनवाड, श्याम कोकाटे, धनंजय पावडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. कल्याणकर म्हणाले की, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी जनतेत जाऊन कामे करावीत. राजकीय पक्षांसोबत युती झाली नाही तरी शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी तयार आहे. त्याचे कारण प्रत्येक प्रभागामध्ये एका जागेसाठी 4 उमेदवार इच्छुक आहेत. ही संख्या लक्षात घेता नांदेड मनपावर शिवसेनेचा भगवा फडकवू, तुम्ही जनतेची कामे करा, असेही त्यांनी सांगितले. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गंगाधर बडुरे यांनी सांगितले की, 15 ते 20 दिवसात मनपा निवडणुका लागणार आहेत. बुथ प्रमुखांनी त्याचे नियोजन करून मतदारांशी संवाद साधावा. बोगस मतदार असणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनेकजणांनी मत व्यक्त केले. यावेळी मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
युती व्हावी अशी इच्छा खा. चव्हाणांची नव्हती
नांदेड जिल्ह्यात पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपासोबत युती व्हावी, ही शिवसेनेची इच्छा होती, परंतु खा. अशोक चव्हाण यांनी युती संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली नाही, किंबहुना शिवसेनेसोबत युती व्हावी, ही त्यांची इच्छा नव्हती. तरीही आम्ही नगरपरिषद निवडणुकीत स्वाभिमानाने लढलो. आता महानगरपालिकेतही आपली पूर्ण तयारी आहे, असे यावेळी आ. बालाजीराव कल्याणकर यांनी सांगितले
No comments:
Post a Comment