नांदेड, दि. ३ जानेवारी २०२४:
सत्यवचनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेतही खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी असत्यकथन केल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा विधान परिषदेचे माजी गटनेते अमरनाथ राजूरकर आणि जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते एकनाथ मोरे यांनी केली आहे.
खा. चिखलीकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील अनेक विकासकामांबाबत धादांत खोटी विधाने केली होती. राजूरकर व मोरे यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधत खासदारांच्या खोट्या विधानांचा पर्दाफाश केला. चिखलीकर हे ‘झूठ की मशीन’ असल्याचे काल त्यांच्या पत्रकार परिषदेतून पुन्हा दिसून आले. अशोकराव चव्हाण यांनी खासदार असताना रेल्वे मंत्र्यांना एकही पत्र लिहिले नसल्याचा आरोप विद्यमान खासदारांनी केला होता. मात्र, चव्हाण यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना लिहिलेली पत्रे दाखवून काँग्रेसने चिखलीकरांचा खोटेपणा उघड केला.
नांदेड जिल्ह्यातील रेल्वे व राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबतही चिखलीकरांच्या दाव्याची त्यांनी पोलखोल केली. लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाला अद्याप अंतिम मंजुरीच नसल्याने सांगून या प्रकल्पासाठी स्वतःचीच पाठ थोपटून घेणाऱ्या विद्यमान खासदारांना तोंडावर पाडले. नांदेड-लातूर थेट नवीन रेल्वे मार्गाचा विस्तृत व्यवहार्यता अहवाल महाविकास आघाडीच्या काळात अशोकराव चव्हाण यांनीच पूर्ण करून घेतला. यामध्ये चिखलीकरांचे काहीही योगदान नाही.
नांदेड जिल्ह्यात आपण शेकडो किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग आणल्याचा दावा चिखलीकर करतात. परंतु, नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या एकूण १४ कामांपैकी १२ कामे २०१४ ते २०१९ या कालावधीत म्हणजेच अशोकराव चव्हाण खासदार असताना मंजूर झाल्याचे काँग्रेसने या पत्रकार परिषदेत सांगितले. माहूरला रोपवेचे काम वेगाने सुरू असल्याचा दावा काल विद्यमान खासदारांनी केला होता. मात्र, तिथे रोपवे नव्हे तर लिफ्टचे काम सुरू आहे. केवळ प्रसिद्धी पत्रके काढण्यात धन्यता मानणाऱ्या चिखलीकरांना जिल्ह्यात नेमके काय सुरू आहे याची तरी माहिती असते का? असा सवाल काँग्रेसने याप्रसंगी केला.
भाऊराव चव्हाण साखर कारखान्याला अलिकडेच मंजूर झालेल्या कर्जावरून अमरनाथ राजूरकर व एकनाथ मोरे यांनी प्रताप पाटील चिखलीकरांना धारेवर धरले. ते म्हणाले की, सदर साखर कारखान्याला राज्य शासनाने अनुदान दिलेले नसून, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्ज मंजूर केले आहे. या कर्जाची कारखान्याला सव्याज परतफेड करावी लागणार आहे. जे कारखाने कर्जमंजुरीसाठी पात्र ठरतात, त्यांना नियमानुसार कर्ज दिले जाते. काँग्रेसची सरकारे असताना भाजप नेत्यांशी संबंधित साखर कारखान्यांना सुद्धा कर्जे दिली जात होती. हा राजकारणाचा विषय नाही. साखर कारखान्यांचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी ही कर्जे दिली जातात. मात्र, कलंबर कारखाना बंद पाडून त्यातील भंगार विकणाऱ्या चिखलीकरांना याचे ज्ञान कुठून असणार? असा बोचरा सवाल त्यांनी केला.
संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरण्याची घोषणा खा. चिखलीकर यांनी केली होती. ते संसदेत बोलताना तर कोणालाच दिसले नाहीत, मात्र मराठा आरक्षणाची मागणी पंतप्रधानांपर्यंत पोहोचवल्याचे प्रसिद्धी पत्रक त्यांनी काढले होते. त्याला आता महिना झाला आहे. त्यानंतर केंद्र सरकारने मराठा आरक्षणासाठी नेमके काय केले? त्याची माहिती चिखलीकरांनी द्यावी, असे आव्हान काँग्रेसने त्यांना याप्रसंगी दिले.
दाजी-भाऊजी यांनी काय केले? या प्रश्नाचा देखील राजूरकर व मोरे यांनी चांगलाच समाचार घेतला. नांदेड विमानतळ, गोदावरी नदीवरील अनेक पूल, गुरुता गद्दी सोहळा व जेएनयुआरएम योजनेंतर्गत झालेली कामे आदींसह जिल्ह्यात झालेली विकासकामे, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालयांची यादीच राजूरकर व मोरे यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवली आणि चिखलीकरांनी नेमके काय केले ते सांगावे? असे आव्हान देखील दिले. अशोकराव चव्हाणांचा विरोध हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे. त्यांचे नाव घेतले नाही तर चिखलीकरांना कोणी विचारणारही नाही, असा चिमटाही त्यांनी काढला.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय बेळगे, प्रवक्ते संतोष पांडागळे, मुंतजीब आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment