राज्य दुष्काळात होरपळत असताना हवामान खात्याच्या अंदाजाने राज्य सरकारच्या चिंतेत भर घातली आहे. यंदा अल्निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 7 जूनला पडणारा पाऊस जूनअखेरीस हजेरी लावेल आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याची माहिती अधिकार्यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत दिली
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळाची चर्चा थांबली होती. मात्र, निवडणूक संपताच दुष्काळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सावध झालेल्या राज्य सरकारने गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे राज्य सरकारला आणखीनच चिंतेत टाकले. अल्निनोचा प्रभाव कमी होत असला तरी तो पूर्णपणे नाहीसा झाला नसल्याने त्याचा परिणाम राज्याच्या पर्जन्यमानावर होणार आहे. राज्यात साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होते. मात्र, यंदा मान्सून जूनअखेरीस राज्यात दाखल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पेरण्यांना उशीर होणार आहे. मात्र, राज्यात पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट उभे असताना पाऊस लांबणार असल्याने पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यातच सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याची माहितीही बैठकीत मंत्र्यांना देण्यात आली. त्यामुळे राज्यात सलग दुसर्या वर्षीही दुष्काळी परिस्थिती निर्माण होते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्य सरकारने दुष्काळी उपाययोजना केल्या असून परिस्थिती नियंत्रणात आहे. पाऊस उशिरा येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीत पाऊस आठवडाभर जरी उशिरा पडला तरी अडचणीचे ठरणार आहे. मात्र, पाऊस लांबला तरी आवश्यक ती काळजी आम्ही घेतली आहे. गेला आठवडाभर उष्णतेची लाट निर्माण झाली होती. मात्र, आता तापमानात घट झाली ही एक समाधानाची बाब आहे.

No comments:
Post a Comment