पुण्यातील भीमा कोरेगाव येथील कार्यक्रमावरून परतणा-या दलित कार्यकर्त्यांवर स्थानिक लोकांनी हल्ला केल्याचा संशय केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली- पुण्यातील भीमा कोरेगाव येथील कार्यक्रमावरून परतणा-या दलित कार्यकर्त्यांवर स्थानिक लोकांनी हल्ला केल्याचा संशय केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. या घटनेत दलित नेते जिग्नेश मेवाणींना दोषी धरता येणार नाही. ज्यांनी हल्ले केले त्यांना पोलिसांनी शोधून काढावे, अशी मागणी त्यांनी केली.
हा हल्ला पूर्वनियोजितच होता. त्यांच्यावरच गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करून आठवले म्हणाले की, हिंसाचाराच्या घटनेमागे पेशव्यांचे समर्थक अथवा ब्राह्मणांचा हात नाही. घटना घडली त्यावेळी गावात त्यांची उपस्थिती लक्षणीय नव्हती, हे लक्षात घ्यावे. काही मुद्यांवरून गैरसमज पसरले होते. त्यामुळे तणाव निर्माण झाला. आता प्रकरण निवळले आहे, असेही त्यांनी सांगितले.
गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवाणींच्या चिथावणीखोर भाषणामुळे हिंसाचार घडला, असा आरोप करण्यात येत आहे. पण या घटनेला त्यांना दोषी धरता येणार नाही. ज्यांनी दलित कार्यकर्त्यांवर हल्ला केला, त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
‘बंद’ची हाक आंबेडकरांची, कार्यकर्ते आमचेच!
आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली नाही. आंदोलनातील चेहरा आंबेडकरांचा असला तरी आमचेच सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते, असा दावा रामदास आठवले यांनी केला.

No comments:
Post a Comment