रणदीप सुरजेवाला यांचा मोदींविरोधात ट्विट
दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा उत्साहपूर्ण सोहळा शुक्रवारी पार पडला. या सोहळ्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत बसवण्यात आल्याने काँग्रेसने नाराजीचा सूर आळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हीन पद्धतीचे राजकारण करत आहेत असा आरोप आता यावरून काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान आणि त्यांचे हीन राजकारण आता जगासमोर आले आहे हेच त्यांच्या या कृतीतून दिसते असेही काँग्रेसकडून म्हटले गेले आहे.
अशात मला जागेची किंवा रांगेची चिंता नाही असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या अॅट होम या कार्यक्रमातही मी बाबत काहीही भाष्य केले नव्हते असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या अॅट होम या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दुसऱ्या रांगेत स्थान देण्यात आले तर प्रजासत्ताक दिन संचलन कार्यक्रमात त्यांना सहाव्या रांगेत स्थान देण्यात आले. यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रजासत्ताक दिन संचलन कार्यक्रमात सहाव्या रांगेत बसून राहुल गांधी गुलाम नबी आझाद यांच्यासोबत चर्चा करताना दिसले. यावेळी काही लोकांनी राहुल गांधी यांच्यासमवेत सेल्फीही काढले. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मोबाइल आणण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासोबत काही लोकांनी सेल्फीही काढले. मात्र राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत स्थान देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हीन दर्जाचे राजकारण आहे अशी टीका काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केली. काँग्रेस विरोधी पक्षात आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही पहिल्या रांगेत स्थान दिले जाते ही परंपरा आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही परंपरा मोडली असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना जाणीवपूर्वक सहाव्या रांगेत बसवण्यात आले. त्यानंतर त्यांना चौथ्या रांगेत बसवले गेले. उद्धट सत्ताधाऱ्यांचे हे वर्तन अशोभनिय आहे असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे. राहुल गांधींना देण्यात आलेल्या वागणुकीबाबत ट्विट करून त्यांनी निषेध नोंदवला आहे.

No comments:
Post a Comment